येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात १४ जानेवारी ते २९ जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमांतर्गत काल बुधवार दिनांक २५/२०२३ रोजी लेखक कट्टा अंतर्गत लेखक, कवी, समीक्षक डॉ. शिवाजी गायकवाड यांची मुलाखत बीएस.सी. प्रथम वर्गातील विद्यार्थिनी कुमारी तनुजा कदम व द्वितीय वर्गातील विद्यार्थिनी कुमारी प्रज्ञा धाबेकर यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान डॉ.शिवाजी गायकवाड यांनी आपल्या एकूण जीवनाचा संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला. दहावी नापास झालेल्या व मराठी विषयात मागे असलेल्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकपर्यंतचा प्रवास संघर्षातून यशाकडे या ब्रीद वाक्याप्रमाणे पूर्ण केला. या अनुषंगाने त्यांनी आपली मुलाखत दिली. मुलाखत घेणाऱ्या विद्यार्थिनींनी डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या कौटुंबिक परिस्थितीबरोबरच शैक्षणिक प्रवास आणि त्यांना करावा लागलेला संघर्ष या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या समग्र जीवनाचा पट उलगडण्याचे महत्त्वाचे काम केले. त्याचबरोबर डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या लेखनाचा प्रवास, तसेच त्यांना प्राप्त झालेले विविध पुरस्कार या अनुषंगानेही त्यांना बोलते केले. कविता लेखन हा त्यांचा अत्यंत आवडीचा लेखन प्रकार असून नुकताच त्यांनी पाटाकेंजा हा कवितासंग्रहही प्रकाशित केला आहे. तसेच समीक्षा लेखनही केले आहे. भाषा संवर्धन अंतर्गत घेण्यात आलेल्या या मुलाखतीतून भाषेने डॉ. शिवाजी गायकवाड यांना कशा पद्धतीने घडविले हे त्यांनी प्रकट केले. यावेळी डॉ. अविनाश ताटे व्ही. जे . शिंदे महिला महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांच्या पुढे विनोदी कथाकथन सादर केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा भाषा संवर्धन पंधरवाडा संपन्न होत आहे. विविध स्पर्धा, व्याख्याने, विद्यार्थी कवी संमेलन, निमंत्रितांचे कवी संमेलन अशा वेगवेगळ्या अंगाने मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगून असे उपक्रम महाविद्यालयात राबविले जावेत यासाठी सदैव प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचा अग्रक्रम राहिलेला आहे. सदर कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार डॉ. वैशाली बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
