बुलडाणा : तांदुळवाडी फाट्यावरील भीषण अपघातात ठार झालेल्या त्या तीन मजुराच्या कुटुंबीयांना कंपनीने तातडीने योग्य ती मदत द्यावी किंबहुना या संदर्भात येत्या शनिवार पर्यंत निर्णय व्हावा अन्यथा या कंपनीतील चार ते पाच वाहने उचलून घेऊन जाईल असा सज्जड इशारा आमदार संजय गायकवाड यांनी या आज १४ फेब्रुवारी रोजी वडोदा फाटा स्थित असलेल्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. माती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाच्या चुकीमुळे पाठीमागे असलेल्या विटांनी भरलेल्या आयशर गाडीचा अपघात झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तांदुळवाडी फाट्या नजीक घडली. या भिषण अपघातात आयशर मधील राजू रतन चव्हाण वय ३७, जीवन सुरेश राठोड वय २७ व सुनिल ओंकार राठोड वय ३३ या तीन मजुरांचा दुदैवी मृत्यू झाला. तर राम मलखंब राठोड वय २६ हा तरुण गंभीरच्या जखमी झाला. हे सर्व मजूर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील रहिवाशी असून ही सर्व तरुण घरातील कर्ते व्यक्ती होती. त्यामुळे या मजुरांना ज्या कंपनीच्या माती वाहतूक टिप्पर मुळे जीव गमवावा लागला त्या कंपनीकडून अपघात ग्रस्त मजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अपघात ग्रस्त मृतकांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी पुढाकार घेत आज थेट वडोदा फाट्यावरील कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावर अपघात ग्रस्त मृतकांच्या नातेवाईकांसमवेत धडक दिली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे तसेच दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.दरम्यान उपस्थित असलेल्या कल्याण टोल च्या अधिकाऱ्यांशी अपघात ग्रस्त मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असता उपस्थित अधिकाऱ्यांनी वाहतुकीचे कंत्राट हे पैठण येथील कंत्राटदाराला दिले असल्याची बाब कथन करताच आमदार संजय गायकवाड यांनी मालवाहतूकीचे कंत्राट घेणाऱ्या पैठण येथील कंत्राटदाराशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधीत चर्चा केली. तद्वतच अपघात ग्रस्त मृतकांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत देण्यात यावी किंबहुना या संदर्भात कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी येत्या शनिवार पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा या कंपनीतील चार ते पाच वाहने मी स्वतः येऊन उचलून घेऊन जाईल असा सज्जड इशारा आमदार संजय गायकवाड यांच्याकडून देण्यात आला. तसेच अपघात ग्रस्त मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून मदत मिळेस्तोवर स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी त्या कुटुंबीयांना दिली.