शेती, प्लॉट, बंगला या बाबींची खरेदी करतांना अनेकवेळा फसवणूक केल्या गेल्या असल्याचे प्रकार वेळोवेळी समोर येऊन घेणार-देणार मध्यस्थी असलेल्या इस्टेट ब्रोकरला जेलची हवा खावी लागल्याचे प्रकार घडल्याचे आपण नेहमीच पाहत असतो. तर असाच प्रकार मलकापूर शहरात एका व्यावसायीकाने प्लॉट खरेदी केला, मात्र बांधकाम करतांना खरेदी केलेला प्लॉट सोडून शेजारच्या प्लॉटवरच भव्यदिव्य अशी स्विमींगपुलसह ईमारत उभी केली. मात्र आपण दुसर्याच प्लॉटवर बांधकाम केल्याचे सदरचा प्लॉट विक्रीच्या उद्देशाने दाखविण्यास इस्टेट ब्रोकरने ग्राहक आणल्यानंतर समोर आला. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक देवाण-घेवाण करून निस्तारण्यात आल्याची खमंग चर्चा शहरात काही दिवसांपासून आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील मराठा मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये एका व्यावसायीकाने प्लॉट खरेदी केला. त्या घेतलेल्या प्लॉटवर भव्यदिव्य अशी इमारत स्विमींगपुलसह उभी केली. त्याच परिसरातील लगतच्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीसाठी इस्टेट ब्रोकर यांनी ग्राहक आणले. संबंधित जागेचे क्षेत्रफळ सांगण्यात आले. मात्र क्षेत्राफळामध्ये तफावत आढळल्याने समोरचा ग्राहक अचंबित झाला. त्यानंतर बाजूला सुरू असलेल्या बांधकामावरील ठेकेदाराकडून सदर प्लॉटचे मोजमाप केले असता ते कमी भरले. ही बाब समोर आल्यानंतर ज्यांना प्लॉट घ्यायचा होता त्या व्यक्तीने त्या परिसरातील ले आऊटचा नकाशा मागवून घेतला. त्यानंतर इस्टेट ब्रोकरने नकाशानुसार जो प्लॉट दाखविण्यास आणले होते त्यावर चक्क भव्यदिव्य अशी स्विमींगटँकसह इमारत बांधण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
इमारत ज्याठिकाणी बांधण्यात आली त्या प्लॉटच्या मालकास त्याठिकाणी बोलविण्यात आले. त्याने चक्क माझा प्लॉट खाली करून देण्याची मागणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. भव्यदिव्य सुसज्ज ईमारत हलवायची कशी? ज्या व्यक्तीने त्या प्लॉटवर इमारत बांधली त्याचा प्लॉट चक्क बाजूला खुला पडलेला होता. मात्र त्याने आपला प्लॉट सोडून दुसर्याच्याच प्लॉटमध्ये बांधकाम केले. या घडलेल्या प्रकाराबाबत नगर पालिका प्रशासनाने शहानिशा न करता विकत घेतलेला प्लॉट सोडून दुसर्याच्या प्लॉटवर ईमारत बांधलीच कशी व परवानगी दिलीच कशी अशी खमंग चर्चा या बांधण्यात आलेल्या भव्यदिव्य इमारतीच्या बांधकामावरून शहरात सुरू आहे.
ज्या मूळ मालकाचा प्लॉट होता त्याठिकाणी इमारत बांधण्यात आली. मात्र तो आपला खाली प्लॉट देण्यावर ठाम राहिला असल्याने इमारत बांधणार्या व्यक्तीवर दडपण आले आणि शहरातील काही व्यक्तींनी मध्यस्थी करून सदर दोन्ही प्लॉटची अलटा-पलटी त्यामध्ये बर्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण करीत हे प्रकरण मिटविण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र सदर प्लॉटची नव्याने खरेदी केली असता त्यावर अलीशान असे बांधकाम असूनही तो बक्कळ प्लॉट दाखवून त्याची खरेदी केली आहे यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल प्लॉट मालकाने बुडवला आहे. एवढेच नव्हे तर आता ज्या प्लॉटवर आलिशान बांधकाम केले आहे त्या बांधकामाची नगरपरिषद कार्यालयाची परवानगीच नसून हे बांधकाम त्वरित जमीनदोस्त करून प्लॉट मालकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी तक्रार देखील नगरपरिषद मलकापूर यांच्याकडे दाखल करण्यात आली आले.आता संबंधित अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
