पालघर : आदिवासी, दुर्बल घटक, कामगार यांच्यासाठी आपले जीवन वेचलेले तसेच मराठी शाळेतील गोर-गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे, पत्रकार, समाजवादी विचारसरणीचे नेते अशी विविधांगी ओळख असलेले दिवंगत अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ राज्य शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी शाळा संस्थाचालक संघ यांच्या वतीने या पुरस्काराची घोषणा शिक्षक दिनी केली जाणार असल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी सेवक या पुरस्काराने गौरविलेले दिवंगत अशोक चुरी हे बहुआयामी नेतृत्व होते. सामाजिक, शैक्षणिक व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांचे हे कार्य असेच उजळत राहावे यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार असल्याचेही भंडारे यांनी म्हटले आहे.

दिवंगत अशोक चुरी यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या कार्याची आठवण करून देणारा असून तो शिक्षकांसाठी प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारा ठरेल असे त्यांच्या पत्नी अनिता चुरी यांनी म्हटले आहे. तसेच चुरी यांच्या नावाने शिक्षकांना दिला जाणारा हा पुरस्कार आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे व त्यांच्या कार्याची पोचपावती देणारा आहे असे त्या म्हणाल्या.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ राज्य शिक्षक पुरस्कार देणे हे आमच्यासाठी गौरवास्पद असून सदर पुरस्कारासाठी २५ अॉक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शिक्षकांना करीत असल्याची माहिती मराठी शाळा संस्थाचालक संघाचे व या पुरस्कार समितीचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी दिली.

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठीच हा पुरस्कार देण्यात येणार असून ७७७७ रू., सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे त्याचे स्वरूप असणार आहे. कै.अशोक नाना चुरी स्मृती राज्य शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेत इ. १ ली ते इ.१० वी पर्यंत अध्यापनाचे काम करणारे शिक्षक/शिक्षिका आपला प्रस्ताव पाठवू शकतात. प्रस्ताव पाठवण्यासाठी ९६०४५२३६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *