पतसंस्थेच्या व्यवस्थापकाची पुन्हा चौकशी करणे गरजेचे
संबंधित अधिकाऱ्यांना व्यवस्थापकाने हाताशी धरल्याची चर्चा..
मलकापूर शहरातील उन्नती महिला नागरिक पतसंस्थेमधे झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हे दाखल झाले खरी मात्र शाखेचा व्यवस्थापक या गुन्ह्यातून सुटला कसा.? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्नती महिला नागरी पतसंस्थेमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी गेल्या वर्षभरांपासून आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी या पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापक व अध्यक्षा यांच्या विरोधात कित्येक वेळा ठिकठिकाणी तक्रारी देखील केल्या मात्र या पतसंस्थेचे अंकेक्षण अहवाल पूर्ण झाले नसल्याने या तक्रारीचे निवारण करण्यासाठी विलंब लागत होता. याकरिता जिल्हा निबंधक यांच्या आदेशाने उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या अंकेक्षण अहवाल करण्यासाठी बुलढाणा जिल्हा निबंधक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक वसंत प्रभाकर राठोड यांनी संपूर्ण अंकेक्षण अहवाल प्रक्रिया पार पाडली व पतसंस्थेचे अंकेक्षण पूर्ण केले या अंकेक्षण अहवालामध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षांनी व एका कर्मचाऱ्याने 6 कोटी 31 लाख 82 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे अंकेक्षण अहवालातून निदर्शनास आणून दिले, यावरून विशेष लेखापरीक्षक यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेचे अध्यक्ष व एका कर्मचाऱ्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले खरे मात्र संपूर्ण पतसंस्था ही मुख्य व्यवस्थापक राजेश चव्हाण यांच्या ताब्यात असताना एवढा कोटी रुपयांचा अपहार झाला कसा..? तसेच या पतसंस्थेचे सर्व दस्तावेज हे व्यवस्थापक चव्हाण यांच्या ताब्यात असताना हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला ..? असा सवाल उपस्थित होत आहे. उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या अंकेक्षणना करिता जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागला आहे यामुळे चांगलेच पुलाखालून पाणी वाहिलेले दिसून येत आहे.पतसंस्थेचे अंकेक्षणही झाले गुन्हे ही दाखल झाले मात्र ठेवीदारांच्या पैशाचं काय असा सवाल ठेवीदार विचारत आहे.गेल्या तीन महिन्यापासून पतसंस्थेचे अंकेक्षण सुरू असताना पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचे चांगलेच धाबे दणाणले होते आपली खटीया खडी, व बिजांटी गोल होणार या धाकाने पतसंस्थेचा व्यवस्थापक राजेश चव्हाण यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वाऱ्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर सदर प्रकरणातून आपला बचाव करीत लेखापरीक्षकला हाताशी धरून आपल्या अंगावरचे घोंगडे झटकून टाकल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. याकरिता पतसंस्थेचे व पतसंस्थेच्या व्यवस्थापकाची पुन्हा चौकशी व्हावी असे कायदे तज्ञांकडून बोलले जात आहे.