मलकापूर :- वाढदिवस म्हटलं म्हणजे बडेजावपणा आलाच, मात्र या बाबीला पुर्णत: फाटा देत माजी नगरसेवक सुहास उर्फ बंडूभाऊ चवरे यांचा वाढदिवस येत्या ३० जून रोजी मित्र परिवराच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराचे अनुकरण करत वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. यामध्ये लि.भो.चांडक विद्यालयाच्या प्रांगणावर दुर्गा वाहिणी शिबिरामध्ये स्वसंरक्षणाचे धडे घेणार्या मुलींना अल्पोपहाराचे वाटप, परिसर स्वच्छतेचा दृष्टीकोन जोपासत स्थानिक बसस्थानक परिसरामध्ये ११ कचरा कुंडी भेट देऊन त्याचे लोकार्पण तसेच शहरातील दिपक नगर भागात असणार्या हनुमान मंदिराच्या परिसराला जाळी कंपाऊंड व गणेश नगर भागातील हनुमान मंदिर येथे दर्शनाकरीता जाणार्या भाविकांना रस्त्याची होणारी अडचण पाहता कच्चा रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवडीचे महत्व जोपासत तब्बल ५०० तुळशी रोपांचे वितरण करून वृक्षलागवड व संवर्धनाचा संदेशही वाढदिवसाचे औचित्य साधून देण्यात येणार आहे. तसेच आपल्या अपंगत्वावर मात करीत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शालेय जिवनाकरीता लागणार्या टिफीन बॉक्स व वॉटर बॅगसह आदी शालेय साहित्याचे वितरण करण्याचे नियोजन बंडूभाऊ चवरे मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे. तर श्री मोहन राव नेत्रालय नांदुरा यांचेद्वारा दिव्यांग बांधवांची नेत्र तपासणी तर सायंकाळी छत्रपती शिवराय प्रतिष्ठाण मराठा मंगल कार्यालय येथे इयत्ता १० वी, १२ वी मध्ये ८५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणार्या व स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन मलकापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.