जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांची पत्रकार परिषदेतून माहिती
उमरखेड :- उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटावा यासाठी वरिष्ठ स्तरावर आग्रही राहणार असून कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पाडून घेतल्या जाईल अशी माहिती आज 19 ऑगस्ट रोजी स्व. एड. अनंतराव देवसरकर सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांनी दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की , राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहे याबद्दल दुःख निश्चितच आहे पण यातून उभारी घेऊन नव्याने पक्ष बांधणीसाठी जिल्ह्याचा माझा दौरा सुरू आहे. नुकतीच माझी नियुक्ती झाली असून जिल्हा भरात कार्यकर्त्याकडून हार तुर्यांनी स्वागत न स्वीकारता पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. परिस्थिती फार बिकट आहे . शासनाकडून होत असलेली तोकडी मदत पूरग्रस्तांच्या कोणत्याही कामे पडली नाही. महागाव तालुक्यात नदी आणि नाल्या शेजारीलच जमिनीचे पंचनामे करण्यात आले आहेत. इतर जमिनीचे काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रति हेक्टरी 13600 पूर पीडितांसाठी मदतीची कमाल मर्यादा होती. आता ती 8500 रुपये केली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे टाकले आहे . शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. मध्यवर्ती बँकेतही लुबाडणूकीचे प्रकार घडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेअरचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू वेळप्रसंगी आंदोलनही उभारू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
उमरखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचे वय लक्षात न घेता कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत आणि त्यांच्या विचारानेच पक्ष पुन्हा नवीन उभारी घेण्यासाठी सक्षम आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागा आपल्याला पक्षासाठी भरपूर काम करायचे आहे असे आवाहनही त्यांनी या आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांना केले असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्र व राज्य पातळीवरून यंत्रणे मार्फत दबाव आणि धाक दाखवून भारतीय जनता पार्टीचे काम सुरू आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर नागरिकांनी यापुढे विचार करूनच योग्य पक्षाला निवडून द्यावे असे आवाहनही या निमित्ताने निकम यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत भास्कर पंडागळे, माजी नगराध्यक्ष राजूभैया जयस्वाल, स्वप्निल कनवाळे , दत्ता गंगासागर, मकसूद भाई , संकेत टोने, निखिल गावंडे , मनीषा काटे , नलिनी ठाकरे , अशोक राऊत , शितल कोरटकर , स्वाती ,साजिद जागीरदार, ईसा राज, यूसुफ सवदागर,रहमत जागीदार,पाचकोरे, प्रदीप भाऊ, सूर्यकांत पंडित, सुभाष जाधव, बालाजी डाखोरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.