सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याकरिता आरक्षित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
(सचिन बिद्री:धाराशिव)
धाराशिव –
जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण 206 प्रकल्पांमध्ये केवळ 10 टक्के जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.भविष्यातील निर्माण होणारी पाणीटंचाईची अडचण लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या वापराकरीता आरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व प्रकल्पातील पाण्याचा उपयोग हा केवळ पिण्यासाठी करणे अत्यावश्यक आहे.पाण्याचा वापर इतर कोणत्याही प्रयोजनासाठी वापर करु नये.तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व भविष्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने काटकसरीने व योग्यप्रकारे उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहे.
त्याप्रमाणे मंडळनिहाय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.भरारी पथके प्रकल्पातून अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी कार्यरत आहेत. अनाधिकृत पाणी उपसा केल्यास भरारी पथकास संबंधिताचे उपसा करण्याचे मोटार संच जप्त करणे,दंड आकारणे,विद्युत पुरवठा खंडीत करणे व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.अनाधिकृत पाणी उपसा करू नये व जलसंपदा विभागास सहकार्य करावे.केवळ पिण्यासाठी पाण्याचा वापर करावा. इतर कोणत्याही प्रयोजनाकरिता पाण्याचा वापर होत असल्यास तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. जलसंपदा विभागात केवळ 26 टक्के कर्मचारी कार्यरत / उपलब्ध असल्याने पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन व वापर होणे आवश्यक आहे.