राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रयत्नांना यश
(सचिन बिद्री:धाराशिव)
जिल्ह्यातील १९८ विविध कार्यकारी सोसायटी संस्थावर अवसायनाची कार्यवाही करत संस्था बंद करण्याची प्रशासनाची प्रक्रिया थांबवन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या शिष्टमंडळाने दि. ११ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. दिलीपरावजी वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन दि.३१ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करत संस्थावर होणारा अन्याय व वृत्तपत्रांनी घेतलेली दखल निदर्शनास आणून दिली. प्रा.बिराजदार यांच्या शिष्टमंडळाच्या मागणीची सकारात्मक दखल घेत ना. वळसे पाटील यांनी विकास सोसायटी बंद न करण्याचे आदेश दिले. यावेळी पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.
धाराशिव जिल्ह्यातील १९८ वि.का सोसायट्यांवर अवसायनाची कार्यवाही करणेबाबत तीव्र गतीने प्रक्रिया चालू होती.यामुळे सदरील संस्था बंद होण्यासाठी अंतिम आदेश देण्यात आले होते. अनिष्ट तफावत कर्ज व्यवहारात 60 टक्के पेक्षा जास्त असलेल्या निकष यासाठी वापरण्यात आला आहे. परंतु वास्तविक परिस्थिती व झालेले वसुली धोरण पाहता उस्मानाबाद जि.म.सह.बँकेने व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुली धोरण राबविताना वसुली रक्कम प्रथम व्याजाला घेतली असून याशिवाय सर्व चुकीचे वसुली धोरण त्यासाठी कारणीभूत होते.बँकेने ज्या ज्या वेळेस ओ.टी.एस व दाम दुप्पट द्वारे वसुली घेतली त्यापूर्वी संस्थेकडून प्रचंड व्याज घेऊनही सभासद शेतकऱ्याला मात्र दाम दुप्पट किंवा त्यापेक्षा कमी रक्कम भरून घेऊन बेबाकी दिली त्यावेळी प्रचंड प्रमाणात संस्थेला नुकसान होऊन अनिष्ट तफावत वाढली. वसुली धोरण बँकेने राबवताना चुकीच्या पद्धतीने राबविले. या सर्व बाबीचा ठोका ठेवत या सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था प्रशासनाने अवसायनात काढण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे ग्रामीण भागातील अर्थवाहिनी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या संस्था बंद होणार होत्या. त्यासोबतच संस्थेतील कर्मचारी, सेक्रेटरी यांचाही पुढे मोठा प्रश्न उभा राहणार होता.
सहकार मंत्री ना दिलीपराव वळसे पाटील यांनी या संस्थांना पुढील काळात संस्था सक्षम व स्वयंपूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत संस्थेच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न व्हावेत अशा सूचना देत अभय दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ.प.) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
यावेळी या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंके , युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.