नांदेड, दि.२७ – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांनी संसदेतील कुठल्याही कामकाजात सहभाग घेतलेला नाही. ते देशाच्या अर्थविषयक स्थायी समितीवर असून, देशासमोरील अत्यंत महत्वाची अर्थविषयक ध्येय धोरणे या समितीमध्ये ठरविली जातात. अर्थविषयक स्थाई समितीच्या बैठकांना देखील ते महिनाभरापासून गैरहजर राहिल्याने हेमंत पाटील यांना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समन्स पाठविला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी हेमंत पाटील यांनी २९ ऑक्टोबर 2023 रोजी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे 31 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून लाक्षणिक उपोषण देखील केले होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांनी संसदेच्या कामकाजात सहभाग घेतलेला नाही. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हे समन्स पाठविण्यात आले असून येत्या ४ डिसेंबर 2023 रोजी त्यांना संसदेत हजर रहाण्यासंदर्भात सांगितले आहे.