धाराशिव : व्यक्ती जन्माला येतो तेंव्हाच त्याचे मरण (अंत) हे निश्चित असतें. पण कोणाचा अंत केव्हा?, हे अद्याप कोणाला समजलेले नाही. त्यामुळेच प्रत्येकाचे आयुष्य,जीवनमान आणि राहणीमान अपेक्षेवर असते. पण अपेक्षा कोणाकडून किती प्रमाणात ठेवाव्यात याची प्रत्येकाला समज असणं आवश्यक आहे. अन्यथा मृगजळ रुपी गाजर खायला जाऊन धोका कधी होईल हे सांगता येणार नाही.
इतिहासातील तो काळ वेगळाच होता, जिथे लोक स्वतःचं वर्तमान पणाला लावून (धोक्यात घालून) इतरांचं भविष्य उज्वल करण्यासाठी लढायचे. आपल्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी सर्वतोपारी त्याग करायचे. या उलट सध्यपरिस्थिती पाहिली तर सर्व काही विपरीत दिसतं. राजकारण हा हल्लीच्या काळात जणू उद्योग बनला आहे. एकदा राजकारणात आमदार, खासदार झालं की स्वतःचं आयुष्य आणि आपले सगेसोयरे सर्वच मालामाल..! येणाऱ्या पिढ्या बसून न्हवे तर झोपून खातील एवढं गबाळ लोकप्रतिनिधीच्या हिस्याला येतं. पण हे गबाळ (कोट्यावधी रुपये) देशातील प्रत्येक नागरिकांच्या कष्टाचे असतात याचं भान कोणालाच राहिलेलं नाही. कारण आजचा मतदार हा निर्भीड, स्वाभिमानी राहिलेला दिसून येत नाही. उदा:-एखाद्या लोकप्रतिनिधीने एक कोटीचा मलिदा गोळा केला तर त्यातले काही क्षुल्लक रुपये ‘हांजी हांजी’ करणाऱ्या व सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना खर्च करतो. त्यामुळे सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळापुरता नवा जोश निर्माण होतो. तो स्वतःच्या आई-वडिलांचे शब्दापेक्षा आपल्या नेत्याच्या शब्दाला अधिक मानसन्मान देवू लागतो. आणि इथंच कार्यकर्ता चुकतो. कार्यकर्ता कधीच मोठा होत नाही याचे हे मुळ कारण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. डोळ्यावर पट्टी बांधून आणि कानात बोळे घालून नेत्यांची ‘हांजी हांजी’ करत त्याचे आयुष्य संपते पण त्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की पश्चाताप करायला वेळही भेटत नाही हे एक कटू सत्य आहे. पण त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर नेता इतका बलाढ्य झालेला असतो की कार्यकर्त्यांचा आवाजही नेत्याच्या कानावर पडणं अशक्य झालेलं असतं. याउलट असेही बरेच नेते मंडळी आपल्या देशात, राज्यात होऊन गेले ज्यांनी पैसा, संपत्ती पेक्षा समाजाच्या अडचणी सोडवून विकासाला अधिक महत्व दिले. त्यामुळेच ते अजरामर झाले. आजही त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते. उदा:-स्व.इंदिरा गांधी,स्व.अटलबिहारी वाजपेयी,स्व. विलासराव देशमुख, स्व. गोपीनाथ मुंडे.
आपल्या उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात सर्वाधिक नेते हे विकासासाठी धडपड करणारे आहेत. पण तरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागतं. नंतर उच्चशिक्षण घेतलेल्या तरुणांना नौकरी साठी परप्रांतात जावं लागतं. दररोज एखाद्या समाजाचे, व्यापाऱ्याचे, शेतकरी किंवा अन्यायग्रस्त पिडीत परिवाराचे आंदोलन हमखास जिल्हात पाहवयांस भेटते. घरात खायला भाकर नाही पण चर्चा नेत्याच्या गाडीची, बंगल्याची किंवा पाकिस्तानी लोकांची हमखास आपण करतो. किती गंभीर आहोत आपण आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी? याची कल्पनाच करू शकतो.
‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही’ हे वाक्य जुनं झालं आहे. कारण, ‘आजच्या कलीयुगात सत्य केवल परेशान नही पराजित भी होता है..!’ हे आजच्या राजकीय घडामोडी पाहिल्यावर लक्षात येतं. हे सर्वाना माहिती आहे तरी बोलण्याचे धाडस कोणात होत नाही. पण आता धाडस करावं लागणार आहे. कारण, लोकसभा निवडणूक समोर आहे आणि मतदान अगदी काही दिवसावर. तुमचा एकच शस्त्र या देशाचं, देशातल्या प्रत्येक नागरिकांचं कल्याण करू शकतो तो म्हणजे ‘मतदान’. आपलं मत अमूल्य आहे, त्याला क्षणिक सुखासाठी विकू नका. मतदान करण्याआधी स्वतःच्या कुटुंबाकडे, घरातील मुलांचे शिक्षण, बहिणीचे लग्न, बेरोजगार भावाची नौकरी, काबाडकष्ठ करणारे तुमचे शेतकरी वडिलांची परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून, विचार मंथन करून योग्य व्यक्तीलाच आपला लोकसभा सदस्य बनवा. मग तो एखाद्या पक्षाचा असो वा अपक्ष असो.
काय हवं आहे जिल्ह्यातील नागरिकांना..?
1)उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, बारा महिने प्रत्येकाला प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे.
2)लाईटबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना विद्युत सुरळीत भेटत नाही. चोवीस तास खंड न पडता लाईट पुरवठा व्हायलाच हवं.
3)जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील उच्चशिक्षित युवक युवतीना आपल्याचं जिल्ह्यात रोजगाराची संधी निर्माण करून द्या. अन्यथा बेरोजगारी भत्ता प्रत्येक पदवीप्राप्त विद्यार्थ्यांला महिना रु.५०००/- द्या.
4) शेतकऱ्यांना केवळ मध्यरात्री उशीरा काही तास तेही कमी दाबाचे वीज भेटत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही 24 तास उच्च दाबाचे विद्युत भेटणे अत्यावश्यक आहे.
5)थकीत कर्ज असले तरी किमान अल्पभूधारक शेतकऱ्यांना विनाअट त्वरित राष्ट्रीयकृत बँकेतर्फे वित्तपुरवठा व्हायलाच हवा. त्यामुळे खाजगी सावकारी थांबेल शेतकरी आत्महत्येला अंकुश बसेल.
6)जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांचे पाल्य त्याचं जिल्हा परिषद शाळेत शिकणे अनिवार्य करा. त्यामुळे जि. प. शाळेचे शैक्षणिक दर्जा सुधारेल आणि इंग्रजी शाळांचे बाजारीकरण थांबण्यास मदत होईल. गोरगरिबांचे लेकरं मोफत चांगलं शिक्षण घेतील.
7)ज्या लहान मुला मुलींचे पालक (आई किंवा वडिल)हयात नाहीत अशा शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, शिक्षण खंडित पडू नये आणि त्यांचे बालविवाह होऊ नये यासाठी विशेष उपक्रम राबवावे.
8) गोमाता संरक्षण, संगोपन. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गोवंशीय प्राण्याबाबत आपुलकी ‘टीव्ही चॅनल्स’च्या माध्यमातून झळकते पण ती प्रत्यक्षात अमलात आणली पाहिजे यातच सर्वांचे हित आहे. जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर, उमरगा, लोहारा शहरात मोठ्या प्रमाणावर गोवंशीय मोकाट जनावरे वावरत आहेत. स्थानीक पत्रकार वारंवार बातम्या करूनही प्रशासन यावर काहीच हालचाली करत नाहीत. कधीकधी या जनावरांच्या भांडणात महामार्गवरील प्रवाशांना मोठी हानी होतेय. तर एखाद्या वासराच्या पायावरून वाहन गेल्याने गंभीर जखमी अवस्थेत पडून राहते तेंव्हा कुठलीच व्यवस्था यांना मदत करू शकत नाही. तेंव्हा ‘टी.व्ही चॅनल्स’वर बोलबोला करणाऱ्या सरकारने खऱ्या अर्थाने गोवंशीय जनावरांना मदत करायची असेल तर पुढाकार ही घ्यावा. त्यामुळे निष्पाप लोकांचे प्राणही वाचतील. तर जिल्ह्यातील ज्या काही अनाथ गोवंशीय जनावरांचे पालन करणाऱ्या गोशाळा आहेत तेथे चारा, पाणी अभावी काय दुरावस्था आहे यावरही संबंधित सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. जर खरंच गोमाता संरक्षण अभियान राबवायचे असतील तर! अन्यथा केवळ ‘टीव्ही चॅनल्स’ पुरते मर्यादित असेल तर काही हरकत नाही, चालुद्या तुमचे! असेच जनता आता जागरूक होत आहे ‘ये सब जानती हैं!’
लक्षात ठेवा मतदारांनो ज्या पक्षाला किंवा नेत्याला पाहून तुम्ही मतदान करता तो पक्ष किंवा तो नेता त्याच पक्षात राहील याची श्वाश्वती नाही. तुम्ही मतदान कोणालाही करा शेवटी सत्तेसाठी विचारांना बाजूला सारून सर्व एक होतील. तेंव्हा तुम्ही प्रचारादरम्यान उगीच अमुक पक्ष किंवा नेता विरोधी आहे असा भास करून घेऊ नका. आज जे विरोधी दिसताहेत, ते भविष्यात एकाच समूहात गुंफलेले दिसून येतील याला नाकारू शकत नाही. त्यामुळे पक्ष आणि त्याच त्या नेत्यांना सत्तेत ठेवण्यापेक्षा आपल्यातून एखाद्या सर्वासामान्य व्यक्तीला आपला लोकसभा /विधानसभा सदस्य निर्माण करा.
(सचिन बिद्री:धाराशिव)