तुळजापूर:- जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, धाराशिव व टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “गुन्हेगारी मुक्त गाव अभियान” व रुद्राक्ष थेअरेपी शिबीर मौजे बारूळ ता. तुळजापूर येथे संपन्न झाले.
याप्रसंगी मा.अतुल कुलकर्णी, टीसचे डॉ.गजानन हिवाळे, श्री. गणेश चादरे, डी वाय एस पी डॉ निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक श्री खांडेकर साहेब, श्री विद्यासागर कोळी, कोहीजनचे मनोहर दावणे, सरपंच व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अतुल कुलकर्णी म्हणाले की, प्रत्येक गावातील सामाजिक एकता व बंधुभाव अखंडीत ठेवण्यासाठी गुन्हेगारी मुक्त गाव अभियान महत्वपूर्ण असून गावातील सजग व जबाबदार नागरिकांनी आपले गाव गुन्हेगारी मुक्त, नशामुक्त व द्वेषमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याच बरोबर त्यांनी रुद्राक्ष थेअरेपीचे फायदे या विषयावर ही सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी टीसचे डॉ गजानन हिवाळे म्हणाले की, गावा-गावातील जातीय सलोखा अखंडीत ठेवण्यासाठी जातीय भेदभाव नष्ट करणे काळाची गरज असून महात्मा बसवेश्वर महाराज यांनी दिलेला सामाजिक एकतेचा संदेश ही सर्वांनी आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी, विद्यासागर कोळी यांनी बांधावरील वृक्ष लागवडीचे फायदे व सेंद्रिय शेतीचे महत्व याविषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री गणेश चादरे यांनी गुन्हेगारी मुक्त गाव, नशामुक्त गाव, पाणीदार गाव, पर्यावरण समृद्ध गावची संकल्पना व याचे होणारे फायदे सध्याच्या व भविष्यातील पिढीला एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी किती महत्वाचे आहेत या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
गावातील 190 नागरीकांनी रुद्राक्ष थेअरेपीचा फायदा घेतला. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठा सहभाग दिला.