गावकुसा बाहेरचा माणूस ते मायानगरी प्रवास
गावकुसा बाहेर जन्मलेल्या माणसांना जगण्याच्या अनेक कला असतं असं म्हणतात.त्यापैकी मी एक यातील कलाकार आहे. गावगाड्यातील रचनेचा पगडा मात्र कित्येक वर्ष बदललाच नाही अजूनही तेथील परिस्थिती काही म्हणावी तशी नाही. जुन्या काळात अनेक दुष्काळ पडायचे. गुरे ढोरे पाण्या वाचुन तरपडून मरून जायची. माणसाला खायला अन्न नसायचं. पोटाचा प्रश्न निर्माण व्हायचा, लहान लहान मुले कशी जगवायचे असे एक ना अनेक प्रश्न माणसाच्या पुढे आ वासून उभे राहायचे. पोटची लेकर अन्नपाण्या वाचून हातपाय खोडून ,टाचा घासून उपाशीपोटी मरून जायची. त्या दुष्काळाचे वर्णन असं केलं जायचं की, बापाचं लक्ष पोटच्या मुलाकडे जात होत.
आणि यातूनच पोटाची खळगी भरण्यासाठी, आलेल्या या दुष्काळाच्या अस्मानी संकटाना रिकाम्या पोटाने दोन हात करण्यासाठी अनेक माणसं गाव गाड्यातून शहराला वाट धरायची. ज्यांच्या आयुष्यामध्ये जिल्ह्याचे ठिकाण कधी पाहायला मिळालं नाही, तालुक्याच्या ठिकाणाला जाण्यासाठी सुद्धा महिन्यातून एका दुसरीच वारी व्हायची. उभा आयुष्य काबाडकष्ट करणारी ही माणसं मात्र दुष्काळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी शहराच्या ठिकाणी पोहचायचे. माझे अनेक नातेवाईक बऱ्याच वर्षांपूर्वी अशाच संकटना तोड देण्यासाठी एका शहरांमध्ये पोहोचले. त्या शहराचं नाव म्हणजे मुंबई!
मित्रांनो आज मला पोलीस इन्स्पेक्टर म्हणून बढती मिळाली आणि माझी नेमणूक पण मुंबई शहरामध्ये झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात आयुष्य जात की काय , असं रखरखत वास्तव असणाऱ्या कुटुंबामध्ये मी जन्माला आलो. गरिबी खूप वाईट असते ती कोणाच्याच वाट्याला येऊ नये.अशा आधुनिक काळामध्ये सुद्धा कोणाच्या वाट्याला येणार नाही असे गरिबीचे चटके आम्हाला सहन करावे लागले माझ्या मते जगातला सगळ्यात जास्त हिंस्र प्राणी कोण असेल तर ती म्हणजे उपाशी माणूस.
आसपासचं गढूळ वातावरण ,सभोवतालची वाईट परिस्थिती ,शैक्षणिक मागासले ,पण दलदलीचा भाग रोज उठून पोटाच्या मागे लागणारी ही माणसं .अशा ठिकाणी स्वप्न पण पडत नाहीत आणि स्वप्न रंगवण्याचा अधिकारही नाही असे वातावरण.
अशा वातावरणात मी परिस्थिती हीच प्रेरणा मानून वाढलो ,शिकलो, घडलो अन् मोठा झालो. लहानपणापासूनच येणाऱ्या संकटांना दोन हात करण्याची उर्मी आम्हाला त्या मातीने दिली. आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोर जायचं असतं असंच तिथले प्रसंग दररोज आम्हाला शिकवण देत होते. ज्या शहराचं सर्वांनाच आकर्षण होतं ,आहे आणि असणार आहे. ते शहर म्हणजे मायानगरी मुंबई.या शहरामध्ये माझी बदली झाली आहे. गेली 13 ते 14 वर्षे ग्रामीण भागामध्ये नोकरी करत असताना प्रचंड अनुभव आले ज्या वातावरणामध्ये मी घडलो वाढलो त्या गोष्टी प्रशासनामध्ये काम करत असताना खूप महत्त्वाच्या ठरतात . ग्रामीण भागात काम करत असताना संवेदनशीलता जपता आली. मुंबई शहरामध्ये नोकरीसाठी येत असताना आज माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत परंतु त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मला मुंबई मायानगरी मध्ये आल्यानंतरच मिळतील.
परंतु या गोष्टीचा अभिमान आहे की मी मुंबईला येतोय ते पोटाची खळगी भरण्यासाठी नाही तर अधिकारी म्हणून शासनाने दिलेली जबाबदारी कर्तव्य पार पाडण्यासाठी येतोय.
एवढं मात्र नक्की ते होते म्हणून आम्ही आहोत.
-स्वप्नील लोखंडे
पोलीस निरीक्षक
'येतोय मुंबईला'.