AMRAVATI | अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली. गावातील एका निर्जन झोपडीत एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनरेगा योजनेअंतर्गत मजूर त्यांच्या कामावर जात असताना ही घटना उघडकीस आली. झोपडीत फासावर लटकलेला मृतदेह मजुरांनी पाहिला, त्यानंतर ही बातमी गावात वेगाने पसरली. मृत तरुणाचे नाव अजय संभुलाल इवणे (वय २९ वर्षे) असे आहे, जो काजलडोह गावचा रहिवासी होता. अजय नुकताच मध्य प्रदेशातील त्याच्या सासरच्या घरातून परतत होता. परंतु, तो त्याच्या गावी पोहोचला नाही. कुटुंबीयांनी सांगितले की, अजय घरी परतत असताना अचानक बेपत्ता झाला. अजयने आत्महत्या केली की कट रचून केलेली हत्या? हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पोलिस या घटनेच्या प्रत्येक पैलूचा गांभीर्याने तपास करत आहेत. अजय आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकत नाही असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
चिखलदरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप फुंडे आणि हर्षल काळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह चूर्णी येथील ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी कुटुंबियांना आश्वासन दिले आहे.
