30 ऑगस्ट पर्यंतचा दिला अल्टीमेटम
(सचिन बिद्री:उमरगा)
केंद्र शासनाच्या 30 एप्रिल 2024 चे जुलमी परिपत्रक रद्द करण्यासह शेतकऱ्याच्या मागण्या 30 ऑगस्टपर्यंत मान्य करा अन्यथा एक सप्टेंबर पासून जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन करणार असल्याबाबत 20 ऑगस्ट रोजी उमरगा तहसील कार्यालयासमोर संपन्न धरणे आंदोलनात आंदोलक अनिल जगताप यांनी सरकारला सूचक इशारा दिला.
तहसील कार्यालयासमोर शेतकरी नेते अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिक विमा देण्यात अडचणीचे ठरत असलेले 30 एप्रिल 2024 चे केंद्र शासनाचे परिपत्रक रद्द करावे, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देताना ई पीक पाहण्याची अट रद्द करावी ,थकीत असलेले कांदा अनुदान ,दूध अनुदान, प्रोत्साहन अनुदान ,सततच्या पावसाच्या अनुदान ,दुष्काळाचे अनुदान ,तुषार संचाचे अनुदान याची शासनाकडे थकलेली रक्कम शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी तसेच 2020 मधील व्याज मागणी याचिकेतील मंजूर रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जगताप यांनी म्हणाले की “आतापर्यंत आम्ही धाराशिव ,तुळजापूर, उमरगा येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत, लोहारा येथे देखील शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन होईल मात्र राज्य व केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या मागण्या 30 ऑगस्टपर्यंत मान्य नाही केल्यास 1 सप्टेंबर पासून धाराशिव जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलनाची मालिका करू असा सूचक इशारा राज्य केंद्र शासनाला दिला.
केंद्र व राज्य शासनाकडच्या प्रलंबित मागण्यासाठी सध्या धाराशिव जिल्ह्यात अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत मात्र शासन अतिशय शांत आहे. शेतकऱ्याच्या मागण्याची आता शासनाने नोंद घ्यावी व मागण्या मंजूर कराव्या यासाठी रस्ता रोको आंदोलन 1 सप्टेंबर पासून करण्यात येणार असल्याचे श्री जगताप यांनी सांगितले.
या धरणे आंदोलनात अनेक शेतकरी बांधवांनी शासनाच्या विरोधामध्ये सडकून टीका केली व आंदोलन तीव्र करा अशी विनंती अनिल जगताप यांना केली.
या धरणे आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय पवार ,उबाठा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबुराव शहापुरे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर पवार , बसवराज वरनाळे,बलभीम पाटील,रजाक अत्तार,राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष प्रदिप जाधव, अविनाश रेणके, वीरपक्ष स्वामी, विजयकुमार थिटे,विलास वाठकर, विजयकुमार नागणे,सुधाकर पाटील, सदाशिव भातागळीकर, संगीता राजेंद्र सलगर, राजेंद्र किसनराव तळखेडे, सुरेश पवार,राऊ ताई भोसले ,अलका गुरव ,भास्कर जाधव ,अतुल पवार, इनामदार, विजयकुमार वाघमारे,अशोक सरवदे ,अभिषेक औरादे, सागर सोनवणे, बाळासाहेब ओंकार , तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.