♦️महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आज जाहीर केला. त्यानुसार आजपासून (ता. १५) आचारसंहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबरला तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.


♦️देशातील महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया होणार आहे. यात ९ कोटी ३ लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया होईल. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत राहील, २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.