‘वाहने सुसाट,महामार्गांचा झगमगाट अन् बैलगाड्यांची वाट चिखलात’
पाणंद रस्त्यांना मुख्य प्रवाहात आणा,शेतकऱ्यांची मागणी
फुलचंद भगत
मंगरुळपीर:-आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात भारताने सर्वच बाबतीत प्रगती केली आहे.महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग,अटल सेतूसारखी करोडो रुपयांचे आधुनिक महामार्ग झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत,महानगरातील नागरिकांना बुलेट ट्रेनच्या माध्यमातून त्यांचा कमी कालावधीत घर गाठता येऊ लागले आहे.मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण कृषिप्रधान देशाला संकटाच्या खाईत लोटणारे ठरत आहे.ग्रामीण भागात शेत रस्त्यांचे जाळे भरपूर प्रमाणात असताना या रस्त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीसोबतच शेतातील माल घरी आणतांना तारेवरची कसरत करून चिखलाची वाट तुडवत शेती व्यवसाय करावा लागत आहे.यासाठी शासनाने पाणंद रस्त्यांना मुख्य प्रवाहात आणून शेत रस्त्यांचा मार्ग सुकर करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खरिपाच्या पेरण्या काही प्रमाणात आटोपल्या असल्यामुळे शेती संबंधीच्या कामांना सद्या वेग आला आहे,त्यात डवरणी,खुरपणी,फवारणी इत्यादी कामांचा समावेश असून शेतकरी भर पावसातही काहीना काही काम काढून शेतशिवारात नित्य नियमाने मार्गस्थ होत आहे.परंतु वाशिम जिल्ह्यातील,तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक गावच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याची वाट अतिशय बिकट झाली आहे.काही ठिकाणी तर जुने खोलवाटीच्या रस्त्यांचे नाल्यात रूपांतर झाले आहे.त्यामुळे कमरेपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे.चिखल तुडवत अनेकांना जावे लागत आहे. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शासनाने गेल्या काळात अनेक रस्त्यांना मंजुरी दिल्याची घोषणा केली होती.मात्र थोडेफार रस्ते वगळता हे मंजुरीतील रस्ते गेले कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना सद्या पडला आहे.यासाठी शासनाने महामार्गाचा झगमगाट अवश्य करावा सोबतच आपली दोन वेळची भूक शमविणाऱ्या मातीचे ईमान जागून शेतकऱ्याच्या शेतालाही रस्ता द्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

लोकवर्गणीतूनच मिळते दरवर्षी शेतरस्त्यांना दुरुस्तीची झालर
शासनाच्या योजनेत निकषाची आडकाठी येत असल्यामुळे पाणंद रस्ते होत नाही,किंवा दानपत्र देऊनही शासनाची मानसिकता सकारात्मक राहत नसल्याने शेत रस्त्यांची वाट बिकट होत चालली आहे.त्यामुळे साहजिकच त्या त्या रस्त्यालगतचे शेतकरी एकत्र येऊन ही बिकट वाट दुरुस्त करण्यासाठी आर्थिक तडजोड म्हणून वर्गणी जमा करतात,त्यातून जेसीबी व ट्रॅक्टर सांगून मुरूम टाकून कसेतरी यावरचे खड्डे बूजवत असतात.हा कार्यक्रम लोकसहभागातून दरवर्षी करावा लागतो.
चांगला शेतीचा रस्ता केला खराब
मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील पाणंद रस्ता आम्ही वर्गणी करुन स्वतः मुरुम भरुन दुरुस्त केला होता पण ठेकेदाराने रस्ता खोदुन नालीतील काळी माती रोडवर टाकल्याने चिखल झाल्याने मोठा ञास होत आहे.येण्याजाण्यासाठी व शेतीपयोगी साहित्य नेण्यासाठी रस्ताच चिखलमय झाल्याने तात्काळ मुरुम टाकुन दुरुस्त करावा.
-निलेश हरिभाऊ ठाकरे,मंगळसा
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206