येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) –
कळंब तालुक्यातील दुधाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाला असुन तो दुरुस्त व्हावा यासाठी दुधाळवाडी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
दुधाळवाडी येथील रहिवासी अमोल चंद्रकांत लाटे यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज दाखल केला असून, या अर्जात सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्ग ते दुधाळवाडी गाव या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गापासुन दुधाळवाडी गावापर्यंतच्या दोन कि.मी. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना व रुग्णांना ये जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
खराब रस्त्यामुळे संतप्त झालेल्या दुधाळवाडीकरांनी रस्ता दुरुस्ती न झाल्यास २१ ऑगष्ट पासुन धरणे आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला आला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक आदी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या या भूमिकेची प्रशासन दखल घेणार का ? अशी चर्चा होत आहे.
