
मंगेश उराडे – नागपूर प्रतिनिधी,
नागपूर: सावनेर शहराच्या आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या निष्ठावान आणि कार्यरत कार्यकर्ती सौ. सोनाली उमाटे यांच्या नावाला नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. राजकीय, सामाजिक, शेती आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत कुटुंबातील एक सक्षम, सुजाण आणि सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
प्रभावी जनसंपर्क आणि सामाजिक कार्यात सक्रियता
सोनाली उमाटे यांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आवडीतून समाजहितासाठी सातत्याने काम केले आहे. आरोग्य शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी शहरात आणि परिसरात मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. पक्षाचा प्रचार, प्रसार आणि संघटना वाढवण्यासाठी त्या कुटुंब, मित्रपरिवार, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने नेहमीच कार्यरत असतात.
माजी नगरसेविका म्हणून कामाचा अनुभव
२०१७ च्या पालिकेच्या निवडणुकीत त्या भरघोस फरकाने निवडून आल्या होत्या. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या प्रभागातील जनतेच्या मूलभूत सोयी-सुविधांची कामे अत्यंत प्रामाणिकपणे करून जनतेची सेवा केली आहे. यंदाचे नगराध्यक्ष पद महिलांसाठी आरक्षित असल्याने, सौ. सोनाली उमाटे या पदासाठी अत्यंत सक्षम उमेदवार असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

महिला सक्षमीकरण आणि सामाजिक नेतृत्व
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची आवड असल्याने त्या गेल्या पंधरा वर्षांपासून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सामाजिक उपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. शहरातील वित्तेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी गरजू महिलांना कर्जपुरवठा करून त्यांना छोटे उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले आहे. तसेच, ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘नवनिर्माण सावनेर’चे ध्येय
उमेदवारीची संधी मिळाल्यास ‘नवनिर्माण सावनेर’ या ध्येय धोरणानुसार प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळून शहराचा विकास आणि जनतेची सेवा करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
नागरिकांनी ग्वाही दिली आहे की, उमेदवारीची संधी मिळाल्यास सौ. सोनाली उमाटे आणि पूर्ण २३ नगरसेवकांचा विजयश्री मिळवून सावनेरमध्ये भाजपचा झेंडा नक्कीच रोवला जाईल. सावनेरच्या नगराध्यक्ष पदाकरिता आणि शहर विकासाकरिता सोनाली उमाटे यांच्या नावाची चर्चा नागरिकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
प्रतिनिधी मंगेश उराडे,
एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर
