• पक्ष निरीक्षक माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची पत्रकार परिषदेत घोषणा..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. १७ नोव्हेंबर)

अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राज्यात महायुतीमध्ये असूनही, जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदार आणि पक्ष निरीक्षक सदाशिव लोखंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पायल बाफना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आणि तरुणांचा आयडॉल म्हणून ओळखले जाणारे आकाश बाफना यांच्या पत्नी सौ. पायलताई आकाश बाफना या शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी पायल बाफना यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे निवडणुकीला नवी दिशा मिळाली आहे.

आकाश बाफना यांच्या प्रवेशाने समीकरणे बदलली

आकाश बाफना यांनी नुकताच मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे जामखेडच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप झाल्याची चर्चा आहे. आकाश बाफना यांच्यासोबत काही विद्यमान नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला असून, आणखी काही नगरसेवक लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत फूट?

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, जामखेडमध्ये शिंदे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने येथील राजकारण अधिक रंजक झाले आहे. यामुळे कोणाला फटका बसेल आणि कोणाचे गणित बिघडेल यावर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जामखेडमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही स्वतंत्ररित्या लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राम शिंदे-रोहित पवार यांच्या गणितात नवी एन्ट्री

आतापर्यंत जामखेडचे राजकारण विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत आकाश बाफना यांनी मैदानावर उतरून केलेला सक्रिय जनसंपर्क, आणि तरुणांमधील लोकप्रियता आणि विविध उपक्रमांमुळे त्यांची ओळख अधिक बळकट झाली. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नवीन उत्सुकता, नवी स्पर्धा आणि तुफान रंगत निर्माण झाली आहे. पायल बाफना यांच्या उमेदवारीमुळे त्यांचे पारडे जड झाल्याची चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे.


प्रतिनिधी नंदु परदेशी,

एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *