• महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि आ. रोहित पवार यांचा संयुक्त उपक्रम..!

जामखेड प्रतिनिधी (दि. १७ नोव्हेंबर)

अहिल्यानगर: कर्जत-जामखेड मतदारसंघातील क्रिकेटपटूंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ (MCA) च्या सहकार्याने या मतदारसंघात राशीनसह आता खेड आणि जामखेड अशा तीन ठिकाणी भव्य क्रिकेट स्टेडियमची उभारणी करण्यात येणार आहे. आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील क्रिकेट खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.

🏟️ तीन ठिकाणी स्टेडियमची घोषणा

या उपक्रमांतर्गत, राशीन (ता. कर्जत) येथे MCA आणि आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून (‘रयत’ संस्थेने जागा उपलब्ध केली आहे) भव्य क्रिकेट ग्राऊंड उभारले जाणार आहे. या ग्राऊंडचे भूमिपूजन मागील वर्षी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते झाले होते. याच धर्तीवर, खेड (ता. कर्जत) येथे देखील MCA आणि आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून ग्राऊंड तयार करण्यात येणार आहे.

खेडमध्ये मा. आ. डॉ. कुमार सप्तर्षी हे अध्यक्ष असलेल्या ‘भारतीय समाज विकास संस्थे’च्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाने या ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. या दोन प्रकल्पांव्यतिरिक्त, जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार हे स्वखर्चातून भव्य अशा क्रिकेट ग्राऊंडची उभारणी करणार असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. लवकरच या तिन्ही ग्राऊंडच्या कामाला सुरुवात होणार असून जामखेड येथील ग्राऊंडच्या कामाचे भूमिपूजनही लवकरच होणार आहे.

MCA चा ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने आमदार रोहित पवार यांनी राज्यात क्रिकेटच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या राज्यात गहुंजे (पुणे), धुळे आणि लातूर या तीनच ठिकाणी MCA च्या मालकीचे ग्राऊंड आहेत. मात्र, आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्राऊंड उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

काही जिल्ह्यांमध्ये जागा खरेदी करून, तर काही ठिकाणी विविध संस्था-संघटनांच्या मालकीच्या जागा लीजवर घेऊन किंवा विकसित करून त्यांची मालकी MCA कडे घेतली जात आहे. उदाहरणार्थ, सोलापूर महापालिकेच्या मालकीचे स्टेडियम MCA ने चालवण्यासाठी घेतले असून, सातारा आणि कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांमध्येही असे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त, MCA च्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल (महाराष्ट्र प्रीमियर लीग) आणि महिला एमपीएल स्पर्धा भरवून राज्यभरातील गुणवान खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

‘फक्त संधीची गरज’

स्टेडियम उभारणीच्या निर्णयाबद्दल बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की,

“राज्यात अनेक होतकरू आणि गुणी खेळाडू असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात पोटेन्शिअल आहे. त्यांना केवळ पायाभूत सुविधा आणि योग्य संधीची गरज आहे. ती मिळाली तर तेही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी संपूर्ण राज्यभरातील क्रिकेट खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असून यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं मोठं सहकार्य आहे. हे ग्राऊंड झाल्यानंतर येथील खेळाडूही राज्याचा नावलौकिक वाढवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे.”

या तीनही ग्राऊंडची उभारणी पूर्ण झाल्यानंतर कर्जत-जामखेडसह ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे त्यांना आपले कौशल्य विकसित करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.


प्रतिनिधी नंदु परदेशी

एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *