प्रतिनिधी आयुब शेख
नळदुर्ग तालुक्यातील मैलापूर येथे होणाऱ्या श्री. खंडोबा यात्रा महोत्सव २०२६ निमित्त दिनांक २ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत लाखो भाविक नळदुर्ग परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राखण्यासाठी नळदुर्ग पोलिसांच्या वतीने कडक वाहतूक व सुरक्षा नियोजन राबविण्यात येत आहे.

यात्रा काळात धाराशिव, सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून ४ ते ५ लाख भाविक वाहनांसह नळदुर्गकडे येण्याची शक्यता असून, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (नळदुर्ग–बायपास रोड) वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाव्य अपघात, जीवितहानी तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
जड वाहनांना बंदीचा कालावधी
दिनांक ०२/०१/२०२६ रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून ते ०४/०१/२०२६ रात्री १२.०० वाजेपर्यंत नळदुर्ग शहर व परिसरात जड व अवजड वाहनांना प्रवेशास मनाई राहणार आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
सोलापूर व तुळजापूरकडून नळदुर्गमार्गे हैदराबादकडे जाणारी अवजड वाहतूक नळदुर्ग येथील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडने नळदुर्ग शहरातून मुरटी पाटी – हैदराबाद मार्गे वळविण्यात येणार आहे.
हैदराबादकडून सोलापूर–तुळजापूरकडे जाणारी अवजड वाहतूक मुरटी पाटी मार्गे नळदुर्ग शहरातून उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडने वळविण्यात येणार आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब) अन्वये हा आदेश जारी करण्यात आला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
हा आदेश पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक शासकीय सेवांच्या वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिक व भाविकांना आवाहन
यात्रा काळात नागरिक व भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नळदुर्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
