• घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांची खंडविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) धाव..!

सावनेर प्रतिनिधी | ०२ फेब्रुवारी

नागपूर: सावनेर तालुक्यातील गडेगाव गट ग्रामपंचायतीमध्ये ३० जानेवारी रोजी आयोजित केलेली ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गावकऱ्यांनी विकासकामांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळत, चक्क सरपंच आणि ग्रामसचिवांनी भर सभेतून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आता खंडविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

नेमके प्रकरण काय?

नियमानुसार २६ जानेवारी रोजी होणारी ग्रामसभा तहकूब करून ती शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. या सभेला भाजपचे बूथ प्रमुख वैष्णव इमराज चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेचा मुख्य उद्देश गावातील विकासकामांचा लेखाजोखा मांडणे हा होता.

‘माझ्या मुलानेच व्यवहार केला’ – सरपंचांचे अजब उत्तर

सभेत वैष्णव चौधरी आणि गावकऱ्यांनी गावातील निधी आणि विकासकामांबाबत माहिती विचारली असता, सरपंच सौ. वंदना दिवाकर धोटे यांनी बेजबाबदार विधाने केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “मला कामाची माहिती नाही, माझ्या मुलाने निधी आणला आणि त्यानेच गावाचे व्यवहार केले,” असे उडवाउडवीचे उत्तर सरपंचांनी दिल्याने सभेत गोंधळ उडाला. प्रश्नांची सरबत्ती वाढताच, उत्तरे न देता सरपंच आणि सचिवांनी सभेतून काढता पाय घेतला.

या कामांच्या चौकशीची मागणी:

गावकऱ्यांनी विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश आहे:

  • मनरेगा अंतर्गत झालेली कामे आणि मजुरी.
  • घनकचरा व्यवस्थापन आणि नाली सफाई.
  • अ‍ॅम्बुलन्स सुविधा आणि वृक्षारोपण मोहीम.
  • स्वच्छता सेवा बॅनर आणि ग्रामपंचायतीचा संपूर्ण विकास निधी.

कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावर तक्रार

लोकशाही मूल्यांचे हनन केल्याचा आरोप करत, सरपंच वंदना धोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मा. खंडविकास अधिकारी (सावनेर), जिल्हाधिकारी (नागपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. नागपूर) आणि ग्रामविकास मंत्रालय (मुंबई) यांना निवेदन देण्यात आले आहे.

या तक्रारीवर वैष्णव चौधरी, अरुण गोंडुळे, शुभम राऊत, प्रवीण दियेवार, दिलीप हेलोडे, विजय ठाकरे, अमोल बोदरे यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रशासकीय बाजू: या प्रकरणाबाबत अधिक माहितीसाठी एनटीव्ही न्यूजच्या प्रतिनिधींनी सरपंच आणि ग्रामसचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.


प्रतिनिधी मंगेश उराडे, एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *