- उपविभागीय कार्यालयातील भ्रष्ट कारभारावर संताप; अवैध धंद्यांनी गाठली सीमा..!
मंगरुळपीर प्रतिनिधी | दि. १७ फेब्रुवारी २०२६
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात सध्या पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून, याला आळा घालण्याऐवजी पोलीस उपविभागातील एका ‘राम’ नावाच्या कर्मचाऱ्याने चक्क हप्तावसुलीचा ‘सेतू’ उभारल्याची खळबळजनक चर्चा परिसरात सुरू आहे.

पोलीस उपविभाग केवळ ‘बुजगावणे’?
मंगरुळपीर पोलीस स्टेशन आणि वाशिमची विशेष पथके अधूनमधून कारवाया करत असली, तरी उपविभागीय कार्यालयाची भूमिका मात्र संशयास्पद ठरत आहे.
- अवैध धंद्यांचे पेव: तालुक्यात सट्टा, जुगार आणि अवैध देशी दारूची विक्री राजरोसपणे सुरू आहे.
- कारवाईचा अभाव: उपविभागाकडून ठोस कारवाया होत नसल्याने हे कार्यालय केवळ ‘मलिदा’ लाटण्यासाठीच आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

- पडद्यामागची मैत्री: अवैध धंदे चालवणारे इसम आणि पोलिसांमधील ‘राम’ नावाचे कर्मचारी यांचे मधुर संबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
- बेजबाबदारपणा: हप्तेखोरीमुळे पोलिसांनी जनतेच्या संरक्षणाचे आपले मूळ कर्तव्य गुंडाळून ठेवल्याचे चित्र ग्रामीण आणि शहरी भागात दिसत आहे.
- राजकीय दबाव की आर्थिक ओढ?: या दुर्लक्ष करण्यामागे नेमके काय कारण आहे? राजकीय दबाव की केवळ आर्थिक लाभ? याचा शोध घेणे आता गरजेचे झाले आहे.

अवैध धंदेवाईकांची मुजोरी वाढली
पोलिसांच्या अभयामुळे अवैध धंदे चालवणारे इसम आता सर्वसामान्य नागरिकांनाही जुमानत नाहीत. भररस्त्यात नागरिकांचा अपमान करणे, अपशब्द वापरणे अशा घटनांमुळे सामाजिक सुसंस्कृतपणा धोक्यात आला आहे. पोलिसांच्या या कर्तव्यशून्यतेमुळे समाजमनावर आघात होत आहे.
“हप्तेखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे खाकी वर्दी डागाळली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेऊन त्या ‘सेतू’ उभारणाऱ्या रामवर आणि इतर दोषींवर तातडीने कारवाई करावी.” — नागरिकांची मागणी
प्रतिनिधी फुलचंद भगत, मंगरुळपीर, वाशिम.
