अहिल्यानगर (प्रतिनिधी):
देशात वाढती महागाई आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असताना, अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी ‘भारतीय ट्रेड युनियन केंद्र’ (CITU) अहिल्यानगर जिल्हा कमिटीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना आज निवेदन देण्यात आले.
कामगारांचे शोषण थांबवण्याची मागणी
गेल्या आठवडाभरापासून मानसर, गुडगाव, नोएडा यांसारख्या मोठ्या औद्योगिक केंद्रांमध्ये कामगारांचे आंदोलन सुरू आहे. आपल्या रास्त मागण्यांना घेऊन सुमारे 20 ते 25 हजार कामगार रस्त्यावर उतरले आहेत.याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील कामगारही आपल्या हक्कासाठी एकवटले जातील. दिल्लीच्या या परिसरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनकर्त्या कामगारांवर पोलिसांकडून लाठी चार्ज, बेदम मारहाण आणि कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलनकर्त्यांना व आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना बेकायदा अटक केली जात आहे. संघटना या हिटलर शाहीचा तीव्र निषेध करते. सध्या कंत्राटी कामगारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असून त्यांना किमान वेतन, कामाचे निश्चित तास आणि सामाजिक सुरक्षेचे (PF, ESIC) लाभ मिळत नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचेही संघटनेने निदर्शनास आणून दिले.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:
१. कंत्राटी कामगारांच्या वेतनात तात्काळ वाढ करून ते किमान वेतन कायद्याप्रमाणे निश्चित करावे.
२. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वाची कठोर अंमलबजावणी करावी.
३. सर्व कंत्राटी कामगारांना पी.एफ. (PF) आणि ई.एस.आय. (ESI) यांसारख्या सर्व सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात.
४. कामाचे तास ८ तासांनुसार निश्चित करून ओव्हरटाईमचा योग्य मोबदला द्यावा.
५. कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे.
कठोर कारवाईचा इशारा
कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांच्या मालकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी ‘सीटू’ने केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने न बघितल्यास कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होऊन औद्योगिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हे निवेदन देताना कॉम्रेड सोमनाथ केंजळे, कॉम्रेड प्रविण सोनवणे,कॉम्रेड संदिप सकट,कॉम्रेड महेबुब सय्यद यांच्यासह ‘सीटू’चे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
