AHILYANAGAR | अहिल्यानगर येथील चेतना लॉनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ‘नेत्रदूत’ जालिंदर बोरुडे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अभियंता इंजि. पी.बी. गायसमुद्रे, उपजिल्हाधिकारी भारती सागरे, उपअभियंता अरविंद जाधव, किरण साळवे आणि बौध्द संस्कार संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब देठे यांसह मान्यवर उपस्थित होते. गुलाबराव खरात यांनी आपल्या मनोगतात बोरुडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे समाजसेवा केली असून हजारो नागरिकांना नवदृष्टी दिली आहे.
कार्यकारी अभियंता इंजि. पी.बी. गायसमुद्रे यांनी बोरुडे यांच्या जिद्दीचे कौतुक करताना म्हटले की, पाटबंधारे विभागातील एका कर्मचाऱ्याने नोकरी सांभाळून स्वतःच्या खर्चातून एवढे मोठे सामाजिक कार्य उभारणे ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला पूर्णवेळ समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनीही फिनिक्सच्या कार्याची प्रशंसा केली, तर आयोजक भाऊसाहेब देठे यांनी प्रास्ताविकात संघाच्या १८ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला.
जालिंदर बोरुडे यांनी गेल्या ३४ वर्षांपासून सातत्याने नेत्रसेवा कार्य सुरू ठेवले आहे. विविध शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या असून, मरणोत्तर नेत्रदानाबाबतही मोठी जनजागृती केली आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एम.बी. साळवे, शैलेंद्र खंडागळे, डॉ. संगिता खंडागळे, इंजि. सजू घोडके, प्रतिभा देठे, कल्पना कांबळे, पोपट खंडागळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर
