AHILYANAGAR| जामखेड तालुक्यातील नान्नज गावची कन्या आणि सेंट मीरा महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मयुरी बाबुराव राजेभोसले यांनी वित्त विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त करून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
डॉ. मयुरी राजेभोसले यांनी ‘महाराष्ट्र राज्यात कृषी कर्जाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीत खासगी क्षेत्रातील बँकांची भूमिका’ या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे. निवृत्त प्राध्यापक बाबुराव संभाजी राजेभोसले यांच्या मार्गदर्शनात आणि शैक्षणिक वारसा जपत त्यांनी पुणे जिल्ह्याचा विशेष संदर्भ घेत हे अध्ययन केले. या संशोधनात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आर्थिक प्रवाह आणि शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या कर्जातून निर्माण होणाऱ्या रोजगाराचा सखोल आढावा घेण्यात आला आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, धोरणकर्त्यांनाही यातून दिशा मिळणार आहे. डॉ. मयुरी यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंब आणि सहकाऱ्यांना दिले असून, “शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा अधिक प्रभावीपणे मिळाव्यात हाच मुख्य उद्देश असल्याचे” त्यांनी नमूद केले. वडील आणि मुलगी दोघेही प्राध्यापक असल्याने या यशाचे विशेष महत्त्व असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नंदु परदेशी, अहिल्यानगर, जामखेड
