PANAJI | देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी नव्हे, तर सत्याची साथ देणाऱ्या डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे व्यक्त केला.
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पणजी येथील कला अकादमीत आयोजित तिसऱ्या ‘राष्ट्रीय महाअधिवेशनाचे’ उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी बातमीमागे सखोल संशोधन असावे आणि डिजिटल मीडियाने नितिमत्ता जपून भविष्याचा वेध घ्यावा, असे आवाहन केले. तसेच संपादकांच्या मागण्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या सोहळ्यात निलेश सांबरे, डॉ. महुवा साहा, कमलाकांत तारी, गुरुप्रसाद पावसकर, विकास देशमुख, चित्रा क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवरांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात ‘पत्रकारितेचे बदलते टप्पे’ यावर परिसंवाद झाला, तर मंत्री उदय सामंत यांची संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रकट मुलाखत घेतली. या सोहळ्याला मंत्री सुभाष फळदेसाई, डॉ. ओमप्रकाश शेटे, खासदार सदानंद तानावडे, अनिल पाटील, सतीश सावंत, इकबाल शेख यांच्यासह देशभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास भोसले यांनी केले, सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार सागर चव्हाण यांनी मानले.
प्रतिनिधी, पणजी (गोवा)
