- वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आणि रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.
- श्री संत नामदेव महाराज संस्थान, उमरज यांचा सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम.
- पत्रकार बांधवांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय व शासकीय कार्यालयांना कुलरचे वाटप.
- गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या पुढाकारातून राबवला समाजोपयोगी उपक्रम.
NANDED | कंधारमध्ये वाढत्या तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले असतानाच, उमरज येथील श्री संत नामदेव महाराज संस्थान मदतीसाठी धावून आले आहे. संस्थानच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि विविध शासकीय कार्यालयांना कुलरचे वाटप करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषतः शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंधार शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयातही रुग्णसंख्या लक्षणीय असल्याने उष्णतेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत उमरज येथील श्री संत नामदेव महाराज संस्थान पुढे सरसावले आहे.
संस्थानचे मठाधिपती गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या पुढाकारातून दि. ६ मे रोजी पत्रकार बांधवांच्या हस्ते कंधार शहरातील शासकीय कार्यालये व ग्रामीण रुग्णालय आरोग्य संस्थांना कुलर भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे उष्णतेचा तीव्र परिणाम काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संस्थानतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक क्षेत्रातही संस्थान सातत्याने कार्यरत असल्याचे यावरून दिसून येते. समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपत संस्थानने पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.
उमरज येथील श्री संत नामदेव महाराज संस्थान हे नेहमीच समाजहिताचे विविध उपक्रम राबवित असते. धार्मिक कार्यासोबतच समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी व सार्वजनिक सुविधांच्या उन्नतीसाठी संस्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे. सद्यस्थितीत उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी प्रा. पुरुषोत्तम धोंडगे, ज्ञानेश्वर तेलंग, जगदीश धोंड, निलेश गौर, डॉ. गंगाधरराव तोगरे, गणेश कुंटेवार, मुरलीधर थोटे, जमीर बेग, एस. पी. केंद्रे, माधव भालेराव, महंमद सिकंदर, शुभम केंद्रे, बालाजी चुकलवाडा, अदिग्विजय कांबळे, विद्यासागर वाघमारे, सागर डोंगरजकर आदी पत्रकार व ग्रामीण रुग्णालय कंधार येथील डॉ. ज्ञानेश्वर केंद्रे, डॉ. आकाश रत्नपारखी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
कंधार प्रतिनिधी, नांदेड.
