धाराशिव, दि. १५ मे (जिमाका / प्रतिनिधी आयुब शेख) : जनगणना – २०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांच्या घर सूचीकरणाची आवश्यक नोंद पूर्ण केली जाणार आहे. काही कारणास्तव दिनांक १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना (Self Enumeration) करू न शकलेल्या नागरिकांसाठी दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत.
या प्रक्रियेदरम्यान शासनाने निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित ३३ प्रश्नांची माहिती नागरिकांनी प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित नागरिकांची नोंद जनगणनेच्या पोर्टलवर करण्यात येणार आहे.
घर सूचीकरण प्रक्रियेमध्ये इमारत व घर क्रमांक, घराचे स्थान, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग व प्रवर्ग, राहण्याच्या खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, उपलब्ध सुविधा, मालमत्ता, साहित्य आदी विविध बाबींची माहिती विचारली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पाडण्यात येणार असून, नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील नागरिकांनी जनगणना – २०२७ च्या पहिल्या टप्प्यात सक्रिय सहभाग नोंदवून दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या घर सूचीकरण प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक माहिती द्यावी आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
धाराशिव जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी राहावा, यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *