फुलचंद भगत
वाशिम:-आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर येथील पोलिस स्टेशन कार्यालयात शांतता समितीची समन्वय बैठक पार पडली. सोशल मीडियावर अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच उघड्यावर कत्तल व मांस विक्री टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंगरुळपीरचे ऊपविभागिय पोलिस अधिकारी विशाल क्षिरसागर आणी ठाणेदार किशोर शेळके यांचेकडुन करण्यात आले.

आगामी २७ मे २०२६ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र ‘बकरी ईद’ (ईद-उल-अजहा) सण साजरा होत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सर्व समाजघटकांमध्ये धार्मिक सलोखा व शांतता कायम राहावी या उद्देशाने दि.२६ मे रोजी मंगरुळपीर पो.स्टे. कार्यालय येथे ‘जिल्हा शांतता कमिटी’ची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक ऊपविभागिय पोलिस अधिकारी विशाल क्षिरसागर,ठाणेदार किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली.यावेळी मुस्लिम बांधवांनी हा ऊत्सव साजरा करण्यासाठी येणार्या ममस्यावर प्रकाश टाकत आपापले मनोगते व्यक्त केलेत. या बैठकीला विविध मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य,प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते बकरी ईदचा सण नेहमीप्रमाणे अत्यंत उत्साहात, शांततेत आणि सर्वधर्मसमभावाच्या भावनेने साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजकंटकांना थारा देऊ नये, असे
आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. कुर्बानीच्या वेळी शासनाने आणि न्यायालयाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही आणि
स्वच्छतेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम इत्यादी)आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारी कोणतीही पोस्ट, मेसेज अथवा व्हिडिओ टाकू नये. पोलीस सायबर सेलचे यावर बारीक लक्ष असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.या सणाच्या दिवशी शहरात आणि महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.मंगरुळपीर येथे नेहमीच शांतता आणि सलोख्याची मोठी परंपरा लाभलेली आहे.आगामी बकरी ईदचा सण देखील सर्वांनी एकत्रित येऊन,एकमेकांच्या भावनांचा आदर करत शांततेत साजरा करावा. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे अशा भावनाही ठाणेदार किशोर शेळके यांनी शांतता समिती बैठकीमध्ये व्यक्त केल्या.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर जि.वाशिम
मो.8459273206
