अन्न सुरक्षा विभागाने तपासणी मोहीम राबविण्याची गरज
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहर व तालुक्यात सध्यस्थितीत उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर प्लाॅस्टीक जारमधील थंड पाण्याचा वापर पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल, दुकाने, शासकिय कार्यालये, व्यावसाईक प्रतिष्ठाणे, तसेच घराघरांत ‘शुद्ध व थंडगार’ म्हणून पुरविण्यात येणाऱ्या आर ओ वाॅटर नामक पाण्याचे जार कॅना बाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी पाणी त्वरित थंड करण्यासाठी मानवी शरीरास घातक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली असून यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी पाण्याचा ‘फ्रीझिंग पॉईंट’ कमी करण्यासाठी “इथिलीन ग्लायकॉल”सारख्या औद्योगिक रसायनांचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, अनेकदा जारचे पाणी काही तासांनंतर उग्र वास येत असल्याच्या तक्रारी नागरिकां कडून करण्यात येत आहेत. तरीही अनेकजण कुठलीही शहानिशा न करता थंड पाणी पित असल्याचे चित्र दिसून येत आहे. “थंड पाणी म्हणजे मशीनद्वारेच थंड केलेले असेल” असा समज सर्वसामान्यांमध्ये असल्याने नागरिक नकळत धोकादायक पाणी सेवन करत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

मंगरुळपीर शहरासह तालुक्यात शेकडो जार प्लांट ! तपासणी कितपत होते?
मंगरुळपीर शहर व तालुका स्तरावर शेकडो कॅन,जार पाणी प्लांट कार्यरत आहेत. अनेकांनी १० रूपयाचा सिक्का टाका ! १८ लिटर शुध्द थंड पाणी मिळवा !!असे स्पाॅटही सुरू केलेले आहेत.मात्र, हे प्लांट सुरू करतांना आवश्यक परवानग्या, अन्न सुरक्षा प्रमाणपत्र, पाण्याची गुणवत्ता तपासणी, जारची स्वच्छता व निर्जंतुकीकरण या बाबींचे काटेकोर पालन होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 (Food Safety and Standards Act) तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार पिण्याचे पाणी प्रक्रिया करणाऱ्या युनिटला परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच नियमित पाणी तपासणी, स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण आणि सुरक्षित साठवणूक आवश्यक मानली जाते. ग्रामपंचायत, नगरपरिषद कार्यक्षेत्रात व्यवसाय चालविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवानाही आवश्यक असतो.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की नियमांचे उल्लंघन?
अन्न भेसळ निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे जार/कॅना पाणी प्लांटची तपासणी करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विशेषतः खालील मुद्द्यांवर चौकशीची गरज व्यक्त होत आहे.पाण्याचा स्रोत नेमका कोणता? ते पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र आहे का?जारची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते का?थंड करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते?रासायनिक पदार्थांचा वापर तर होत नाही ना?ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध आहेत का?
नागरिकांनीही घ्यावी काळजी
तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी शक्यतो स्वतःचे पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणारे थंड पाणी पिताना त्याचा वास, चव व स्वच्छता तपासणे आवश्यक आहे. संशयास्पद पाणी सेवन टाळावे व कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ अन्न सुरक्षा विभाग किंवा स्थानिक प्रशासनाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
जनहिताचा प्रश्न; तातडीने कारवाईची अपेक्षा
उन्हाळ्यात वाढती मागणी आणि नफ्याच्या स्पर्धेमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल, तर हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जात आहे. शासन व संबंधित विभागांनी तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
