अवकाळीने परिसरातील शेती तोट्यात; शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

फुलचंद भगत
वाशिम:-खरीप हंगामातील अतिवृष्टी पाठोपाठ रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने तांडव घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पेरणीसाठी खते, बियाणे व कीटकनाशके खरेदीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. यामुळे काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामातील पेरणीची तजवीज कशी करावी, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पिकाच्या भरोशावर दुकानादाराची उधारी, बँकांच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा आहे. सरकारने घोषित केलेली कर्जमाफीही निकषनिश्चितते अभावी रखडली आहे. यामुळे आता खरीप हंगामातील पेरणीकरिता शेतकऱ्यांसाठी वाली कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.बदलत्या हवामानामुळे शेतीची अनिश्चितता झाली आहे. कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे.पीक कर्जावरही आहे अनिश्चिततेचे सावट आहे.दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडेनासा झाला आहे. यामुळे शेती तोट्यात जात असून शेतकरी कर्जबाजारी बनला.खरीप तोंडावर आहे. कर्जमाफीही रखडली असून, पीक कर्जावरही अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे आधी कर्जमाफीचे निश्चित करा, अशी मागणी शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे परिसरातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आधी कर्जमाफी करा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून सरकारकडे दिली जात आहे.पीक कर्ज, पीक विमा आणि कृषी योजना या निकषांच्या चौकटीत बांधील असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांचा लाभ होऊ शकला नाही. दरवर्षी पेरणी. पेरणीनंतर हातातोंडाशी आलेला घास कधी अतिवृष्टीमुळे, तर कधी पाण्याअभावी मातीमोल होतो.

अवकाळी पावसामुळे आधीच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात बाजारात शेतकऱ्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. कांदा कवडी मोल भावात विक्री करावा लागत आहे. शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. त्यामुळे रोजच्या खर्चासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.पीक विमा आणि कर्जमाफीच्या घोषणेशिवाय शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच येत नाही. यंदाही अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. खरिपात अतिवृष्टीने अतोनात नुकसान केले. झालेले नुकसान भरून काढण्याचे रब्बी हंगामातून चांगल्या उत्पादनाचे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले. परंतु अवकाळी पावसाने सर्वकाही हिरावून घेतले. अशा विदारक स्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख कर्जमाफीची घोषणा केली. परंतु त्या घोषणेची पूर्तता मात्र अद्यापही करण्यात आली त्यामुळे जुन्या थकबाकीतून मुक्त रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय नवीन पीककर्जही शेतकऱ्यांना मिळणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे. अशी मागणी आता शेतकरी बांधवांमधून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *