फुलचंद भगत
वाशीम:-वाशीम हिंगोली महामार्गावरील तोंडगाव टोल नाक्यावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या राजस्थानमधील एका संशयित आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, दोन दोन सहकारी फरार झाले आहे. ही कारवाई ६ जून रोजी रात्री १०.३० वाजतादरम्यान करण्यात आली.
  आरोपींनी वाशीम बायपासवरील एका पान टपरीवर ५०० रुपयाची बनावट नोट देऊन साहित्य खरेदी केले होते. ही बाब पान टपरी चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने तोंडगाव टोल नाक्यावर संपर्क साधून माहिती दिली.दरम्यान, हे आरोपी टोल नाक्यावर पोहोचले असता, ’फास्टॅग’ बंद असल्याचे सांगत त्यांनी तेथेही ५०० रुपयांची बनावट नोट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या टोल नाक्याचे मॅनेजर रवी गोटे यांनी प्रसंगावधान राखत चालकाला गाडी मागे घेण्यास भाग पाडले आणि आरोपीला रोखून धरत पोलिसांना पाचारण केले.माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस उपविभागीय अधिकारी पथक आणि ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आसीफ अली मोहम्मद मजीद (वय २५) रा. जि. नागौर, राजस्थान यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेली राजस्थान पासिंगची स्कार्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, मुख्य आरोपीसोबत असलेले अन्य दोन साथीदार टोल नाक्यावरून पसार होण्यात यशस्वी झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसतील ही बनावट नोटांसंदर्भातील दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वीही पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून आरोपीला अटक केली होती.ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने परिसरात खळबळ ऊडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *