नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
पुणे ( प्रतिनिधी ) सुपे, ता. बारामती : सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये बेकायदेशीर व्यवसायांना पुन्हा ऊत आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गुटखा विक्री, मोबाईल चक्री, जुगार तसेच इतर गैरकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बारामती च्या सुपे परिसरातील काही ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याची तक्रार आहे. अल्पवयीन युवकांपर्यंतही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक किरकोळ दुकानांमधून गुप्तपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय मोबाईल चक्री आणि ऑनलाईन माध्यमातून चालणारे जुगाराचे प्रकारही वाढल्याची माहिती पुढे येत आहे. काही ठिकाणी पैशांच्या देवाणघेवाणीसह जुगाराचे अड्डे सुरू असल्याची चर्चा असून त्यामुळे युवक वर्ग चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक फसवणूक, कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक वाद वाढण्यास अशा प्रकारचे व्यवसाय कारणीभूत ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध व्यवसायांविरोधात अधूनमधून कारवाई होत असली तरी ती सातत्यपूर्ण नसल्याने संबंधित व्यावसायिक पुन्हा सक्रिय होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी गुप्त माहिती संकलित करून नियमित धाडी टाकाव्यात, अशी मागणी होत आहे.परिसरातील पालक आणि सामाजिक संघटनांनीही वाढत्या अवैध व्यवसायांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
युवकांना व्यसन आणि जुगाराच्या विळख्यातून वाचविण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नागरिकांची मागणी
सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या गुटखा विक्री, मोबाईल चक्री, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच दुर्लक्ष ….. !
राजकीय दृष्ट्या महत्वाचे केंद्र मानले जाणारे बारामती तालुक्यात स्थिती चिंताजनक आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाला या सर्व गैरव्यवसाय बद्दल वस्तुस्थितीची माहिती आहे. परंतु गैरव्यवसायिकांशी आर्थिक हितसंबंध आहेत त्यामुळे कारवाई होत नाही असे सर्वसामान्य नागरिक सांगतात.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी पोकळ घोषणा
या परिसरात प्रतिबंधित गुटखा यासह अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. येथील गैर व्यवसाय विरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक तयार करून दखल घेणार असल्याचे मीडियाला मागील आठवड्यात सांगितले होते.
प्रत्यक्षात मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांची घोषणा पोकळ ठरली आहे.
