बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात खासदारपुत्र सौरभ बजरंग सोनवणे याला अटक करण्याच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवांची बैठक पार पडली असून, सरकारला तीव्र इशारा देण्यात आला आहे.
विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या बारा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. विलास घुले यांच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर समाजबांधव आणि नातेवाईक आक्रमक झाले आहेत.
मोर्चाच्या नियोजनासाठी बीड येथील संत भगवान बाबा प्रतिष्ठान येथे व्यापक बैठक घेण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातून नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले हे गेल्या बारा दिवसांपासून उपोषण करत असून, प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून, सीआयडीकडून अद्याप वेळ मागितला जात असल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्यावरच्या राजकीय दुश्मनीचा राग माझ्या भावावर काढण्यात आला. निष्पाप भावाचा बळी गेला,” असा आरोप रमेश घुले यांनी केला. आरोपींना अटक होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
