बीडच्या माजलगाव तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील फुलेनगर वस्तीकडे जाणारा शासकीय रस्ता गेल्या वर्षभरापासून अतिक्रमणामुळे बंद आहे. रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून, १५ ऑगस्टपर्यंत रस्ता खुला न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
शासकीय रस्ता बंद असल्याने फुलेनगरमधील सुमारे ४० कुटुंबांचे दळणवळण ठप झाले आहे. विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रुग्णवाहिका आणि शेतीच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.
१५ ऑगस्टपर्यंत रस्ता खुला न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
