हायकोर्टातील लिपिक पदासाठी आज टायपिंग परीक्षा पार पडली. मात्र, यावेळी खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
परीक्षा केंद्रावरील कॉम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये बिघाड, तर अनेक कीबोर्डची बटणे व्यवस्थित काम करत नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, ते नापास झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी परीक्षार्थींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्र किंवा प्रशासनातील कोणीही पुढे येत नसल्याने गोंधळ आणखी वाढला.
परीक्षा पूर्वीप्रमाणे हायकोर्टातच घेण्यात यावी आणि तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
