संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एसटी महामंडळाने स्मारकासाठीची जागा संगमनेर नगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे.
२०१८ साली तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात स्मारकासाठी ठराव करण्यात आला होता. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणात्मक अडचणींमुळे जागा हस्तांतरणाला विलंब झाला. २०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व परिवहन मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जागेची मागणी केली होती. त्यानंतर ६ मीटर बाय ४ मीटर जागेला मंजुरी मिळाली.
नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, राजेंद्र दामोधर जगताप, दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, किशोर पवार उपस्थित होते.
उपलब्ध जागेत चौथरा आणि अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू करण्यात येणार असून पुतळ्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांसाठी आमदार तांबे यांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. स्मारक परिसरासाठी अतिरिक्त २२०० चौरस फूट जागेसाठी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा सुरू आहे.
