भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खापा शहरात देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बाजार चौकातील महात्मा गांधी पुतळा परिसरात ज्येष्ठ नागरिक मेहबूब शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान व्यक्त केला. नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, नगराध्यक्ष पियूष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, नगरसेवक नामदेव गजभिये यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, पोलीस पथक, होमगार्ड, विद्यार्थी-शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राज्यगीत आणि झेंडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश लष्करे यांनी केले, तर सेवादल अध्यक्ष नारायण लांबट यांनी आभार मानले. कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशप्रेमाचा संदेश देण्यात आला.
मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
