अहिल्यानगरच्या सावेडीतील वैदवाडी परिसरात अवैध मावा बनवणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. बबन रामा लोखंडे याला ताब्यात घेत त्याच्याकडून इलेक्ट्रिक मशीन, तयार मावा आणि सुगंधीत तंबाखू-सुपारीसह एकूण 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

18 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बबन लोखंडे हा मातोश्री किराणा स्टोअरजवळील लोखंडी चाळ, वैदवाडी येथे पत्र्याच्या खोलीत सुगंधीत तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा तयार करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला असता बबन रामा लोखंडे, वय 32 वर्षे, हा इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना आढळून आला. त्याच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचे मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशीन, 10 हजार रुपयांचा 5 किलो तयार मावा आणि 14 हजार रुपयांचा 20 किलो सुगंधीत तंबाखू मिश्रित सुपारी चुरा व प्लॅस्टिक पुड्या, असा एकूण 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मावा तयार करण्यासाठी लागणारी सुगंधीत तंबाखू आणि सुपारी मेहराज, पूर्ण नाव माहीत नसलेला, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर, हा पुरवत असल्याची माहिती बबन लोखंडे याने दिली असून तो फरार आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *