• जुनी गाववेस जीर्ण अवस्थेत
  • दुर्घटनेची शक्यता; ग्रामस्थ चिंतेत
  • पंचायत समितीकडे निवेदन सादर
  • संरचनात्मक परीक्षणाची मागणी
  • दुरुस्ती किंवा नवीन गाववेसीची मागणी
  • तातडीच्या सुरक्षा उपाययोजनांची मागणी

AHILYANAGAR | अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मौजे ठाकूर निमगाव येथील मुख्य प्रवेशद्वारावरील जुनी गाववेस अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत ॲड. लक्ष्मण पांडुरंग मडके आणि साईनाथ पंढरीनाथ कातकडे यांनी पंचायत समिती, शेवगाव येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गाववेसीच्या वरच्या भागात पूर्वी ग्रामपंचायत कार्यालय कार्यरत होते. सध्या या इमारतीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून संपूर्ण बांधकाम कमकुवत झाले आहे. गावातील मुख्य रहदारीचा रस्ता याच कमानीखालून जात असल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी, दुचाकी-चारचाकी तसेच शेतीची वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गाववेस कोसळल्यास जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती अर्जदारांनी व्यक्त केली आहे. गाववेसीची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून सक्षम अभियंत्यामार्फत संरचनात्मक परीक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.दुरुस्ती शक्य असल्यास तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा जीर्ण गाववेसीचे निर्लेखन करून त्याच ठिकाणी सुरक्षित आणि मजबूत नवीन गाववेस उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तोपर्यंत आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | शेवगाव, अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *