यवतमाळमध्ये वेतनाच्या प्रश्नावरून वनमजूर रमाकांत शुक्ला यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल ३० वर्षे सेवा बजावूनही वेतन न मिळाल्याने चार दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या रमाकांत शुक्ला यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रमाकांत शुक्ला यांचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. रमाकांत शुक्ला यांनी सुसाइड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याचे गंभीर आरोप केल्याची माहिती आहे.
३० वर्षे सेवा बजावूनही वेतन न मिळाल्याने त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता आणि त्यात विजयही मिळवला होता. मात्र, न्यायालयीन लढा जिंकल्यानंतरही वारंवार पाठपुरावा करून वेतन मिळाले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेर या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणी सामाजिक वनीकरण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मृतकाच्या मुलीने केली आहे. आता या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
