अहिल्यानगर जिल्ह्यात गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. चार ठिकाणी छापे टाकून सात आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले असून 4 लाख 35 हजार 85 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तीन पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

23 ऑगस्ट 2026 रोजी पथकाने श्रीरामपूर शहर, शनिशिंगणापूर आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पानमसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि मावा असा एकूण 4,35,085 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 3 लाख 70 हजार रुपयांच्या मुद्देमालासह शाहरूख शहानूर शहा आणि फरार शोएब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिशिंगणापूर येथे 21 हजार 488 रुपयांच्या मुद्देमालासह फरार अनिल माधव वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

संगमनेर शहरात दोन कारवायांमध्ये अनुक्रमे 36 हजार 788 आणि 6 हजार 809 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणांत वसीम मेहमूद खान, अझहर दिलावर पठाण यांच्यासह फरार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *