जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्या प्रेरणेतून ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत ‘एक दिवस शाळा स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शालेय परिसर, परसबाग, सभोवतालचा परिसर तसेच वर्गखोल्यांची स्वच्छता करण्यात आली. शाळेच्या परिसरात वाढलेल्या तणावर तणनाशकाची फवारणीही करण्यात आली.
उपक्रमाचे उद्घाटन पोलीस पाटील गोकुळ शंकोपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांनी प्रास्ताविकातून ‘एक दिवस शाळा स्वच्छतेसाठी’ या उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले.
यानंतर उपस्थितांच्या सहभागातून शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी अंजाळे केंद्राचे केंद्रप्रमुख तुषार सोनवणे, समावेशित शिक्षण समन्वयक गुरुदास शिंपी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेश शंकोपाळ, विठ्ठल कृपा महिला बचत गटाच्या सदस्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले. सहशिक्षिका श्रीमती कविता महाले यांनी आभार प्रदर्शन केले.
