जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकळीत महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. नूतन साकळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने लोकनियुक्त सरपंच तथा संस्थेचे सभासद दीपक नागो पाटील यांच्या नावाचा प्रतिनिधी म्हणून निवडीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
सहकार संस्था प्रशासनाच्या परिपत्रकानुसार दि. २७ रोजी नूतन साकळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली. संस्थेचे सचिव प्रमोद लोधी यांनी जिल्हा बँकेच्या हंगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्थेला एका सभासदाच्या नावाचा ठराव सादर करावयाचा असल्याची माहिती दिली.
यानंतर ज्येष्ठ संचालक सुनील बाबूलाल नेवे यांनी संस्थेचे सभासद तथा साकळी गावचे लोकनियुक्त सरपंच आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते दीपक पाटील यांच्या नावाचा ठराव मांडला. उपस्थित सर्व संचालकांनी या प्रस्तावाला एकमताने सहमती दर्शवली. सचिव प्रमोद लोधी यांनी दीपक नागो पाटील यांच्या नावाचा ठराव सर्वसहमतीने मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा केली.
या बैठकीस चेअरमन मरिबाई सर्फराज तडवी, व्हाईस चेअरमन ईश्वर धोंडू कोळी यांच्यासह सुनील बाबूलाल नेवे, सुभाष भास्कर महाजन, मोहन काशिनाथ बडगुजर, अरुण रामचंद्र खेवलकर, निंबादास पंडित पाटील, आत्माराम चुडामण तेली, राजू पंडित बडगुजर, तज्ज्ञ संचालक विलास लक्ष्मण पवार, शेख सलीम अब्दुल हक तसेच संचालिका लिलाबाई भगवान मराठे आणि आशाबाई रवींद्र बडगुजर उपस्थित होत्या.
दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली साकळी गावात विविध विकासकामे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले. त्यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याने सहकार क्षेत्रातून त्यांच्या नेतृत्वाला पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे. निवडीनंतर साकळी परिसरात दीपक पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
