महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील धगधगते पान म्हणजे दलित पॅंथर! अन्यायाविरुद्ध उगारलेली मूठ आणि बाबासाहेबांनी दिलेल्या स्वाभिमानाची निर्भीड डरकाळी म्हणून या चळवळीने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला हादरा दिला.

१९७२ मध्ये नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दलित पॅंथरची उभारणी केली. जातीय अत्याचार, सामाजिक बहिष्कार आणि अन्यायाविरुद्ध पॅंथर कार्यकर्ते थेट मैदानात उतरले. फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर आधारित या चळवळीने ‘दलित’ या शब्दाला व्यापक अर्थ दिला.

या चळवळीने मराठी साहित्यालाही विद्रोही भाषा दिली. पुढे १९९८ मध्ये प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले आणि प्रा. जोगेंद्र कवाडे हे तीन आंबेडकरी-रिपब्लिकन नेते लोकसभेत पोहोचले. मात्र गटबाजी, वैचारिक मतभेद, व्यक्तिकेंद्री नेतृत्व आणि प्रस्थापित पक्षांचा हस्तक्षेप यामुळे चळवळीची संघटनात्मक ताकद कमी होत गेली.

नेत्यांची संख्या आणि गट वाढले, मात्र स्वतंत्र राजकीय आवाज आक्रसत गेला. राज्यसभा, विधान परिषद किंवा इतर पदे मिळाली, पण समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर स्वतंत्र संघर्ष किती उभा राहिला, हा प्रश्न आजही कायम आहे.

जातीय अत्याचार, आरक्षणाचा अनुशेष, बेरोजगारी, भूमिहीनता, शिक्षण आणि शिष्यवृत्ती यांसारखे प्रश्न आजही आहेत. तरीही पदाची अपेक्षा न ठेवता काम करणारे कार्यकर्ते आणि संविधानाचा अभ्यास करणारी नवी पिढी आजही अस्तित्वात आहे.

पॅंथर संपलेला नाही, तो विखुरला आहे. मतभेद असले तरी सामाजिक प्रश्नांवर एकजूट, व्यक्तीपेक्षा विचार आणि पदापेक्षा समाज मोठा मानण्याची गरज आहे. एकेकाळी संसद हादरवणारी ही चळवळ पुन्हा स्वाभिमानाने उभी राहणार की सत्तेच्या मृगजळामागे आपली सामूहिक ताकद हरवणार, हा प्रश्न आजही कायम आहे.

शब्दरचना व संकलन : शाकीर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *