GOA | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पणजी, गोवा येथे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात धाराशिव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. एन टीव्ही न्यूज मराठीचे जिल्हा प्रतिनिधी आयुब शेख यांना त्यांच्या धडाकेबाज पत्रकारितेसाठी विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गोवा येथील कला अकॅडमीमध्ये आयोजित या भव्य महाअधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते पत्रकार आयुब शेख यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सदानंद शेट तानावडे, ओमप्रकाश शेटे, आमदार शिवाजी पाटील, रामकृष्ण वेताळ आणि चंद्रकांत कळेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारिता क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे आयुब शेख यांना आतापर्यंत तब्बल ४० विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उपेक्षित, वंचित आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. प्रशासनापर्यंत प्रश्न पोहोचवण्याची त्यांची धडाकेबाज शैली आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना आयुब शेख म्हणाले की, “सामान्य माणसाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय राहिले आहे. आजवर मिळालेले ४० पुरस्कार हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहेत.” या सन्मानानंतर त्यांच्या मूळगावी नळदुर्गसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आयुब शेख, एनटीव्ही न्यूज मराठी, धाराशिव.
