MPSC संयुक्त परीक्षा गट-ब 2025 च्या निकालात 76 उमेदवारांची दोन पदांवर निवड झाल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. उपलब्ध पदे रिक्त राहू नयेत यासाठी निकाल पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी आमदार अॅड. विक्रम पाचपुते यांनी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त परीक्षा गट-ब 2025 चा निकाल 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला. यात Sub Registrar पदासाठी 84, State Tax Inspector अर्थात STI पदासाठी 279 आणि ASO पदासाठी 3 उमेदवारांची निवड झाली आहे. यापैकी 76 उमेदवारांची Sub Registrar आणि STI या दोन्ही पदांवर निवड झाली आहे.
MPSC ने नुकताच ‘One Candidate, One Post’ निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय संबंधित जाहिरातीला लागू नसल्याने एकाच उमेदवाराची दोन पदांवर निवड झाली आहे. त्यामुळे काही पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.
Sub Registrar पदासाठी यापूर्वी ASO, STI आणि PSI पदांवर निवड झालेल्या काही उमेदवारांनीही परीक्षा दिल्याने निकालाच्या यादीवर परिणाम झाला आहे. विशेषतः PSIच्या 322 जागा पूर्णपणे भरल्या जाणार नाहीत, तसेच STIची 76 पदे रिक्त राहण्याची शक्यता आमदार पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून निदर्शनास आणून दिली आहे.
त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांकडून ‘Opting Out’ किंवा पदांचा पसंतीक्रम मागवून त्यानुसार नव्याने निकाल प्रसिद्ध करावा, अशी मागणी श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. विक्रम बबनराव पाचपुते यांनी केली आहे.
दुहेरी निवड झालेल्या उमेदवारांकडून पसंतीक्रम घेऊन रिक्त होणाऱ्या जागा पात्र उमेदवारांमधून भरण्याची संधी मिळाल्यास उपलब्ध पदे रिक्त राहणार नाहीत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, आमदार पाचपुते यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता MPSCकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
