यावल तालुक्यातील दहिगाव येथील बेपत्ता तरुण नरेंद्र उर्फ न्यायबु यादव पाटील याचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ३० ऑगस्ट रोजी घरातून कोणाला न सांगता निघून गेल्यानंतर त्याच्याबाबत पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, दहिगाव शिवारातील नावरे रस्त्यावरील नामदेव गुरुजी यांच्या शेतातील विहिरीत नरेंद्रचा मृतदेह दुपारी आढळून आला. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरेंद्र दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. दारू सोडवण्यासाठी धुळे येथे त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले होते. त्यातच त्याचे मानसिक संतुलनही बिघडले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असे खबरीत म्हटले आहे.
नरेंद्रच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. दहिगावात दारूमुळे अनेक तरुणांचे बळी जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
